मुंबई – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा करण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडणार असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी महिला दिनाचे औचित्य साधत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ‘मंत्रिमंडळात महिला मंत्री नसणे हे कमीपनाचं वाटत असल्याची खंत व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत सरकारला फटकारले.
एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री नसणे हे कमीपणाचे वाटते असं पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही मी अनेकदा मीडियाशी बोलताना देखील याचा उल्लेख केला आहे अशी आठवण देखील यावेळी अजित पवार यांनी करून दिली. तमाम महिला वर्गालाही ही गोष्ट योग्य वाटत नाही परंतु सरकारला नेमकी काय अडचण आहे हे माहिती नाही अशा शब्दात विरोधीपक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला मदतीची मोठी गरज आहे यावर देखील अजित पवार यांनी भाष्य केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी होणार आहे.
अधिवेशनात महिला मांडणार लक्षवेधी
विधानसभा कामकाजात आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे. यामध्ये यशोमती ठाकूर, देवयानी फरांदे, भारती लव्हेकर , मंदा म्हात्रे, श्वेता महाले, यामिनी जाधव , जयश्री जाधव, सरोज अहिरे यांचा समावेश आहे.महिला धोरण महिला दिनी मंजूर व्हावे असा महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यात काही सूचनांचा समावेश करावा, अशी विशेषत: महिला आमदारांची मागणी होती.