महाबळेश्वर -महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांचे पती व हॉटेल व्यावसायिक दीपक बापूराव कांदळकर (वय 48, रा. नगरपालिका सेवक सोसायटी) हे वेण्णा लेकजवळून काल (दि. 5) पासून बेपत्ता झाले आहेत. तलावाजवळ त्यांची गाडी व वस्तू आढळल्या असून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू आहे.
दीपक कांदळकर यांच्या चपला, मोबाइल व इतर वस्तू सोमवारी सायंकाळी वेण्णा लेकजवळ आढळल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांच्या सहकार्याने सोमवारी रात्री आठ वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. ती मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास थांबवून सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. याबाबत माहिती अशी, माजी नगराध्यक्ष सौ. ज्योती कांदळकर यांचे पती व हॉटेल व्यावसायिक दीपक हे भाचा सिद्धार्थ व मित्रांसमवेत रोज सायंकाळी फिरायला जात होते; परंतु ते सोमवारी एकटेच फोर्ड गाडी घेऊन गेले.
वेण्णा लेकपासून एक किलोमीटर अंतरावर लिंगमळा परिसरात एक बंगला चालवायला घेतला असून तेथून ते वेण्णा लेक परिसरात गेले होते. सिद्धार्थला घरी सोडायला त्यांनी बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांचे सहकारी किरण काळे हे सिद्धार्थला घेऊन महाबळेश्वरकडे निघाले असता, वेण्णा लेकच्या एका वळणावर आठच्या सुमारास सिद्धार्थला कांदळकर यांची गाडी दिसली.
गाडीच्या मागील सीटवर त्यांचे जॅकेट, स्वेटर ठेवलेला होता; परंतु कांदळकर तेथे दिसले नाहीत. त्यामुळे किरण व सिद्धार्थ यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता, तलावावरील लोखंडी पुलावर मोबाइल आढळला. तेथेच त्यांची चप्पलही आढळली. या वस्तूवरून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबतची माहिती समजताच महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे, सुनील भाटिया व सहकाऱ्यांनी रात्री साडेआठच्या सुमारास वेण्णा तलावात शोधमोहिमेस सुरुवात केली. मंगळवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ही मोहीम सुरु होती. अंधारामुळे व तलावात पाणी जास्त असल्याने शोधमोहिमेत अडथळे येत होते. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक संदीप साळुंखे, कुमार शिंदे, युसूफ शेख, रवींद्र कुंभारदरे, सुनील शिंदे, दत्तात्रय वाडकर, संजय जंगम उपस्थित होते. मंगळवारी सकाळी सहा वाजता पुन्हा या शोधकार्य सुरू करण्यात आले. महाड, रायगड येथील प्रशिक्षित स्कूबा डायव्हर्सची टीमदेखील दुपारी घटनास्थळी दाखल झाली.
कांदळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. करोनाच्या कालावधीत ते अस्वस्थ व सतत चिंतेत असल्याची माहिती मिळत आहे. कांदळकर यांनी त्यांचे मित्र जीवन महाबळेश्वरकर यांना ”डीीूे इहर्री ङरज्ञश” या आशयाचा व्हॉटसऍप मेसेज 6 वाजून 52 मिनिटांनी केला होता. त्यापूर्वी त्यांनी पत्नीशीही संपर्क साधल्याचे सांगण्यात आले.