Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्याविषयी केलेली टिप्पणी लज्जास्पद असल्याचा पलटवार भाजपने केला. तसेच, राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली. पीएम (पंतप्रधान) म्हणजे पनौती मोदी असा उल्लेख राहुल यांनी राजस्थानमधील सभेत बोलताना केला. त्यावरून भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर शाब्दिक प्रतिहल्ला चढवला.
राहुल यांनी केलेली टिप्पणी निषेधार्ह आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचा उल्लेख कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मौत का सौदागर अशा शब्दांत केला होता. त्यानंतर गुजरातमध्ये कॉंग्रेसची नौका बुडाली. त्याची आठवण राहुल यांनी ठेवावी.
विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसचा पराभव निश्चित आहे. त्याची जाणीव झाल्याने राहुल नैराश्यातून अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. त्यांनी माफी मागावी. अन्यथा, आम्ही हा मुद्दा अतिशय गंभीर बनवू, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडियावरून राहुल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कठोर मेहनत आणि दूरदृष्टीमुळे मोदींचा केवळ देशातच नव्हे; तर संपूर्ण जगात आदर केला जात आहे. त्यामुळे ते देशाचे शत्रू, दहशतवादी आणि कॉंग्रेसजनांसाठी दु:स्वप्न ठरले आहेत.
त्यातून कॉंग्रेसला आलेल्या नैराश्याचे प्रतिबिंब राहुल यांच्या वक्तव्यातून उमटलेले दिसते, असे त्यांनी म्हटले. मोदी हे जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनली आहे. जनतेचे जीवनमान उंचावले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.