मसूर/उंब्रज -करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळावी यासाठी उंब्रज पोलीस ठाण्याने “एक गाव एक गणपती’ उपक्रमाचे आवाहन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 111 गावांना केले होते. त्यापैकी 101 गावातील मंडळांनी “एक गाव एक गणपती’ तर काही गावांमध्ये सार्वजनिक गणपती उत्सव साजरा न करण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने घेण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.
मसूर पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी प्रविण जाधव, तारळेचे मोहन तलबार, चाफळचे पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे, पोलीस हवालदार अभय भोसले, युवराज पवार, हेमंत कुलकर्णी, फिरोज शेख, लक्ष्मण जगधने, कृष्णा जाधव यांनी गावागावात स्थानिक गणेश मंडळाचे प्रमुख, सरपंच, गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांची सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत बैठक घेतली होती. 111 गावांपैकी 101 गावातील मंडळांनी “एक गाव एक गणपती’ व काही गावांमध्ये सार्वजनिक गणपती उत्सव साजरा न करण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सदर गणेशोत्सवात होणारा खर्च हा गावातील नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर, व्हीटामीन सी, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, गरजूंना धान्य वाटप, काही ठिकाणी ग्राम सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित गावांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन अजय गोरड यांनी केले आहे.