दिलासादायक! देशात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 3 लाखाच्या पार

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे थैमान घातले आहे. अशातच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून यंत्रणा कोलमडताना दिसत आहे. दरम्यान, अशा वातावरणात आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे. मागील चोवीस तासात 3 लाख 8 हजार 522 लोक बरे होऊन घरी परतले आहेत.

पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. तर या चोवीस तासांमध्ये 3,684 जणांचा मृत्यू झाला आहे. या अगोदर शुक्रवार कोरोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. शुक्रवारी एका दिवसात देशात 4 लाख 1 हजार 911 नवे रुग्ण आढळले होते. मागील चोवीस तासात जगभरात 8.66 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 46 टक्के रुग्ण एकट्या भारतातील आहेत.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. राज्यात शनिवारी कोरोनाचे 63,282 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 802 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 46,65,472 वर पोहोचली आहे. यातील 69,615 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 62,919 नवीन रुग्ण समोर आले होते. तर, 828 जणांचा मृत्यू झाला होता.

मुंबईमध्ये शनिवारी 3,897 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, 90 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबईमधील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6,52,368 वर पोहोचली आहे. तर, 13,215 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, की मागील चोवीस तासात राज्यात 61,326 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 39,90,302 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 6,63,758 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.