मायणी -काही अडचणींमुळे मायणी येथील मेडिकल कॉलेज आ. जयकुमार गोरे यांच्याकडे पार्टनरशिप देण्यात आली. मात्र, संस्थेचे कर्ज भागवण्यासाठी ऍग्रिमेंट झाल्यानंतर सर्व कर्ज भागवण्याचे नियोजन झाले होते. तथापि, 2019 पासून आजअखेर आ. गोरे यांनी संस्थेचा कर्जाचा एक रुपयाही भागविला नाही तसेच हे वैद्यकीय महाविद्यालय फुकट बळकावण्यासाठी आ. गोरेंकडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांच्या विरोधात कटकारस्थाने केली जात आहेत, असा आरोप संस्थेचे पदाधिकारी दीपक देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार आ. जयकुमार गोरे यांच्याकडे संस्थेचे कर्जे भागवण्यासाठी पार्टनरशिप देण्यात आली मात्र आजअखेर आ. गोरे यांनी एक रुपयाही कर्ज भागविले नाही. संस्थेचे विद्यमान खजिनदार व आ. जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांनी मात्र संस्थेविरोधात ईडीकडे तक्रार केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, संस्थेने कोणताही भ्रष्टाचार न केल्याने पळपुटी भूमिका न घेता डॉ. एम. आर. देशमुख ईडीच्या चौकशीस सामोरे गेले.
येथील सुरू असलेले आयुर्वेद महाविद्यालय बंद पडावे व तेथील विद्यार्थी अन्य महाविद्यालयात सामील करून घ्यावे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे आमदारांनी बनावट तक्रार केली तसेच महाविद्यालयाची 2021- 22 ची मान्यता बनावट तक्रार देऊन नामंजूर करून घेतली. वास्तविक या संस्थेच्या माध्यमातून आमदारांनी करोना काळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला.
मात्र, आ. गोरे यांच्यावर कारवाई न करता आता ज्यांनी ही संस्था निर्माण केली त्यांच्यावरच कारवाई केली जात असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांकडून जमा केलेली प्रवेश फी संस्थेच्या विकासात्मक कामासाठी वापरल्याने संस्था आर्थिक अडचणीत आली व हे देणे अशक्य झाल्याने संस्थेने महाविद्यालय आ. जयकुमार गोरे यांच्याकडे चालविण्यास दिले होते. यासंदर्भात सर्व चौकशींना सामोरे जाण्याचे संस्थेने ठरविले आहे. केलाच नाही तो भ्रष्टाचार लोकांपुढे मांडून लोकांची दिशाभूल करून हे वैद्यकीय महाविद्यालय बळकावण्याचा प्रयत्न आमदार गोरेंकडून सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.