निवडणूक राज्य जुलमाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आहे ः पवार

शेवगाव  – ही निवडणूक पक्षासाठी नसून, जुलमाच्या जोखडातून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी आहे. त्यासाठी आजचा तरुणच सरसावला असून, त्यानेच सत्ता बदलाचा निर्धार केला आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेत परिवर्तन अटळ असल्याचे भाकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादीचे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ बोधेगाव येथे आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. चंद्रशेखर घुले, डॉ. मेधा कांबळे, तालुक्‍यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना विधानसभेसाठी सभा घ्याव्या लागतात. हे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे द्योतक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार निष्क्रिय आहे. बेरोजगारी वाढली आहे. एका वर्षात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कंपन्या बंद पडत आहेत. शेतमालाला भाव नाही. मात्र सत्ताधारी 370 कलम हटवले या विषयावरच बोलतात.

पाच वर्षांपूर्वी ज्याचे नाव माहीत नव्हते ते अमित शहा शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा प्रश्न विचारत आहेत. मी मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामांतर, महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण दिले, मंडल आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसींना न्याय दिला.

माजी आ. नरेंद्र पाटील घुले यांनी तालुक्‍यातील ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी या सरकारने अपुरा निधी दिल्याने ही योजना रेंगाळली, अशी टीका केली. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी प्रास्तविक केले. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर शिवशंकर राजळे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.