भावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-१)

पती-पत्नीच्या विवाहानंतर त्यांच्यात टोकाचे मतभेद झाले. एकाने घटस्फोटासाठी अर्ज दिला व दुसऱ्याने त्याला विरोध केला, तर ज्या कारणासाठी घटस्फोट मागितला ते कारण सिद्ध न झाल्याने अनेकदा घटस्फोटाचा अर्ज अमान्य केला जातो. कारण सिद्ध झाले नाही, मात्र भावनात्मक नाते संपुष्टात आले आहे, अनेक वर्षापासून पती-पत्नी विभक्त राहत आहेत, त्यांचे वैवाहिक सबंधही जर अनेक वर्षापासून संपुष्टात आले असतील, तर अशा वेळी राज्यघटनेतील परिशिष्ठ 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाला घटस्फोट मंजुर करण्याचा अधिकार आहे. मात्र असा घटस्फोट मंजुर करताना संबंधीत पत्नीच्या भवितव्याचा विचार करुन तिला एक मुठी पोटगी दिली पाहिजे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-२)

4 ऑक्‍टोबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संजय किशन कौल व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने आर. श्रीनिवास विरुद्ध आर. शमेथा या अपीलामधे घटस्फोटाच्या खटल्यात हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सदर खटल्यातील श्रीनिवास-शमेथाचे 1993 साली लग्न झाले. त्याना 1995 साली एक मुलगाही झाला. 1997 सालापासुन त्यांच्यात मतभेद सुरु झाले. पतीने 1999 साली “पत्नी जास्तीत जास्त वेळ माहेरीच राहते, त्यामुळे तिच्याविरुद्ध क्रूरतेच्या’ कारणावरुन घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल केला. कुटुंब न्यायालयाने श्रीनिवास क्रूरता सिद्ध करु शकला नाही, म्हणुन हा अर्ज फेटाळला. त्यावर त्याने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात अपील दाखल केले. तेथेही न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले म्हणून श्रीनिवासने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावेळी अपिलकर्त्याच्या वतीने सबंधीत पती-पत्नी हे 22 वर्षांपासून विभक्त राहत असून, त्यांचे वैवाहिक संबंध टिकणे अशक्‍य असून राज्यघटनेच्या परिशिष्ट 142 च्या अधिकारानुसार संबंधित पतीला घटस्फोट मंजूर करावा व पत्नीला आयुष्यभराची एकत्रित पोटगी देण्यास आपण तयार असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्यासाठी दुर्गाप्रसाद त्रिपाठी विरुद्ध निलु कोहली (2006)4 एससीसी 558, संघमित्रा घोष विरुद्ध काजल कुमार घोष (2007)2 एससीसी 220, समर घोष विरुद्ध जया घोष (2007)4 एससीसी 511 अशा विविध खटल्याचा आधार देण्यात आला. मात्र प्रतिवादीतर्फे परिशिष्ट 142 नुसारच्या अधिकारात हे अपील बसत नाही, तसेच न्यायालयासमोर जोपर्यंत दोघा नवरा-बायकोचा संमतीने घटस्फोट अर्ज येत नाही, तोपर्यंत घटस्फोट करता येणार नाही, असा युक्तीवाद करणेत आला. त्याला आधार म्हणुन प्रतिवादीतर्फे चेतना दास विरुद्ध कमला देवी (2001)4 एससीसी 250, विष्णु दत्त शर्मा विरुद्ध मंजु शर्मा (2009)6 एससीसी 379 अशा खटल्यांच्या आधारे अपील फेटाळण्याची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.