शालेय स्पर्धेत रंगतदार कुस्त्यांचा थरार

नगर  – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समिती आयोजित तर नवनाथ विद्यालयाच्या सहकार्याने निमगाव वाघा (ता. नगर) येथे घेण्यात आलेल्या नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे उदघाटन रंगतदार कुस्त्यांच्या सामन्यांनी झाले. नगर तालुक्‍यातील 36 शाळांमधील 386 मल्लांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पहिल्याच दिवशी कुस्तीचा थरार रंगला होता. या रंगतदार सामन्यात युवा मल्लांनी विविध डावपेचांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
मैदानाचे पूजन करुन तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्या हस्ते मल्लांची कुस्ती लावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी रघुनाथ झिने, क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे, प्र.मुख्याध्यापक किसन वाबळे, भागचंद जाधव, काशीनाथ पळसकर, धनंजय खर्से, नेप्तीचे सरपंच सुधाकर कदम, पै.कादर शेख, भानुदास ठोकळ, पोपट शिंदे, उद्योजक दिलावर शेख, पै.संदीप डोंगरे, गुलाब केदार, जालिंदर आतकर, गव्हाणे, आदिंसह कुस्तीपटू, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक पै.नाना डोंगरे यांनी केले.रामदास भोर म्हणाले की, स्पर्धा ग्रामीण भागातच घेतल्याने खेळाडूंना वाव मिळतो. ग्रामीण भागातील अनेक गुणवंत मल्ल पुढे येत असून, खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी सर्वसोयीयुक्त सुसज्ज मैदानाची गरज आहे.
इतर खेळांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. त्यामानाने कुस्तीला सध्या चांगले दिवस आले आहेत. तालुकास्तरावर सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

निमगाव वाघा येथील मिलन मंगल कार्यालयात दिवसभर मुलांच्या कुस्त्या रंगल्या होत्या. सदर कुस्त्या मॅटवर खेळविण्यात आल्या असून, या दोन दिवसीय स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचे सामने देखील रंगणार आहेत. पंच म्हणून राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, गौरव पाटील, समीर पटेल, रमाकांत दरेकर, मल्हारी कांडेकर, गणेश जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ पळसकर यांनी केले. आभार महेंद्र हिंगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)