शेवगाव -करोना साथरोगाने सर्वांनाच जरब बसविली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथम 31 मार्च अखेर अन् नंतर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा फतवा काढला. पोलीस प्रशासनाला त्यासाठी कठोर उपाय अमलात आणण्याचे आदेश दिले. करोनामुळे आधीच धास्तावलेले नागरिक आता पोलीस प्रशासनाच्या दहशतीने सरळ झाले आहेत. त्यामुळे मात्र एक झाले, ग्रामीण भागातील नागरिकही आता स्वयंशिस्त पाळू लागल्याचे चित्र आढळते आहे.
या काळात दूध, भाजीपाला, किराणा यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वेळा ठरवून दिल्या गेल्या. सुरुवातीला आठवडे बाजार बंद झाला तर रोजची मंडई म्हणजे आठवडे बाजारच बनला. तिथे बाजारकरू गर्दीने दुकाने मांडू लागली. त्यावर नगरपालिकेने या व्यवसायिकांना सकाळी व सायंकाळच्या वेळेबरोबरच कोणी कोठे थांबायचे हे प्रभागनिहाय नेमून त्यांच्या बसण्याच्या जागा व त्यातील अंतरही ठरवून दिले. या व्यवसायिकांनीही आपल्या दुकानापुढे ग्राहकांनी ठराविक अंतरावर उभे राहून भाजी खरेदी करावी म्हणून खुणा केल्या.
किराणा, मेडिकल दुकानदारांनी आपल्या शटरच्या बाहेर दोर लावून त्याच्यापुढे खुणा करून ग्राहकांनी कुठे उभे राहायचे यासाठी गोल, चौकोनी जागा आखून दिल्या. लोकही आता शहाण्यासारखे त्याचा अंमल करत आहेत. आरोग्य विभागाने एवढा प्रचार केला की, अगदी वाडी वस्तीवरही घरात येणारांना हात पाय धुण्यासाठी अंगणात पाण्याची बादली व साबण ठेवलेली असते. तर शहरात हस्तांदोलन न करता दोन्ही हात जोडूनच स्वागत होतांना आढळते. रस्ते व बाजारपेठा निर्मनुष्य आहेत.
भाजीपाला, धनधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याकडून या काळात माणुंसकीचे दर्शन घडते आहे. यावेळी शेतकऱ्यांनी वा भाजी विक्रेत्यांनी या संधीचा गैरफायदा उठवण्यासाठी नागरिकांची कुठे अडवणुक केलेली नाही. शेवगा, फ्लॉवर, कोबी, कांदे, बटाटेही स्थिर आहेत. संत्री वीस रुपये किलोने मिळत आहेत. ज्वारी, बाजरी, गव्हाचे भावही वाढले नाहीत. किराणा मालाचे भावही आज तरी मागच्या महिन्यात होते तेच आहेत. एकूणच आज तरी जनसामान्यामधील स्वयंशिस्ती बरोबर माणुसकीही दिसत आहे.
अनेक किराणा व्यावसायिक व्हाट्सअपवर पाठविलेल्या यादीनुसार किराणा घरपोहच करण्याची सुविधा देवून लोकांना घरातच थांबण्यास प्रवृत्त करत आहेत. तर महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. मेघा कांबळे यांनी किरकोळ उपचारासाठी बाहेर लांबवर न येता जवळच्या मेडिकलमधून पेशंटचे नाव व काय दुखते हे सांगितले म्हणजे मेडिकल दुकानदारास औषध द्यावे हे सांगण्याची सुविधा
दिली आहे.