बारामती -बारामती एमआयडिसीमधील कार्व्हर एव्हीएशन प्रायव्हेट लिमिटेड खासगी संस्थेचा परवाना रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
बारामती येथे एव्हीएशन प्रायव्हेट लिमटेड वैमानिक संस्था आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या संस्थेमध्ये विद्यार्थिनी मोठं स्वप्न घेऊन लाखो रुपये फी भरून त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.लाखो रुपयांची फी भरण्यासाठी अनेक पालक कर्ज काढतात. या संस्थेमार्फत विमान चालकाचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडण्याची पालकांना आशा असते.
मात्र, एका अधिकाऱ्याने विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तन केल्याने त्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याचे निलंबन केले असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मात्र, दोन महिन्यांच्या कालावधीनंतर तेच अधिकारी प्रशिक्षण देत असल्याचे समोर आले आहे. हीबाब पीडित विद्यार्थिनीने व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणली.
मात्र, संस्था या अधिकाऱ्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संस्थेचा खेळ सुरू आहे. देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थी हिताची या संस्थेत काळजी घेतली जात नाही, त्यामुळे संस्थेचा परवाना रद्द करावा तसेच संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविपने केली आहे.