हात, पाय, तोंड बांधून केले वार : रक्तबंबाळ अवस्थेत कोंडून पळाला
पिंपरी – टेम्पो घेण्यासाठी वडील पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खूपच क्रूरपणे खून केला. ही घटना दापोडी येथे मंगळवारी (दि.16) घडली.
सुनील मुतय्या पोलकम (वय 68, रा. भाटीया चाळ, दापोडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. राजेश सुनील पोलकम (वय 38, रा. इंद्रायणीनगर, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. योगेश रमेश येवले (वय 35, रा. सुंदरबाग कॉलनी, दापोडी) यांनी बुधवारी (दि. 17) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत सुनील हे एका कंपनीतून निवृत्त झाले होते. आरोपी राजेश याला टेम्पो घ्यायचा असल्याने तो पैसे मागत होता. मंगळवारी सकाळी आरोपी राजेश याने आपल्या वडिलांचे हातपाय दोरीने आणि तोंड रुमालाने बांधले व कोयत्याने वार केले. त्याच अवस्थेत वडिलांना घरात कोंडून तो निघून गेला. एका शेजारी राहणाऱ्या नागरिकाने पोलिसांना फोन करुन बंद घराबाबत शंका व्यक्त केल्याने प्रकार उघडकीस आला. आरोपी राजेश याची आई आणि मयत सुनील यांच्या पहिली पत्नीचा नुकताच मृत्यू झाला होता. दशक्रिया विधी गुरुवारी जळगाव येथे होता. सुनील यांनी दशक्रियेस येण्यास नकार दिल्याचा रागही राजेशच्या मनात होता.