भोर – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गाचे कामदेखील रखडले आहे. हे काम 2010 साली सुरू करण्यात आले ते 2013 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु 2019 साल संपायला अवघे सहाच दिवस शिल्लक असतानाही हे काम पूर्ण झाले नाही.
अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय वाहनचालकांचाही खोळंबा होत आहे. त्यामुळे हा टोलनाका बंद करण्यात यावा,, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावरील सर्व्हिस रस्त्याची कामे अयोग्य पद्धतीने केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. स्थानिकांच्या गरजा लक्षात न घेता सर्व्हिस रस्ता तयार करण्यात आल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर यावे लागते. परिणामी या परिसरात वाहतूक कोंडी होते. मध्यंतरी मा. जिल्हाधिकारी पुणे यांनीदेखील या रस्त्याच्या कामात अनियमितता झाली असल्याचे मत नमूद
केले आहे.