पिंपरी – सरकारी कामासाठी पैशांची मागणी करत असल्याबाबत दिलेल्या एका तक्रार अर्जावर तहसीलदारांसमोर चौकशी सुरु असताना तक्रारदाराने तहसील कार्यालयातील लिपिकाला मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 7) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अप्पर तहसीलदार कार्यालय, आकुर्डी येथे घडला.
अतुल काळूराम तापकीर (वय 45, रा. चोविसावाडी, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुनील इरन्ना कास्टेवाड (वय 29, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हे आकुर्डी येथील तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड हद्दीतील जमीन संकलानाचा कार्यभार आहे.
जगनाथ ताजणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत त्यांच्या जमिनीचे बिनशेती परवाना करण्यासाठी तहसील कार्यालयात 29 जुलै रोजी अर्ज केला होता. त्याबाबत 7 सप्टेंबर रोजी अतुल तपकीर यांना विनिश्चीती सनद देखील देण्यात आली. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी “बिनशेती परवाना देण्यासाठी फिर्यादी सुनील कास्टेवाड हे प्रती गुंठा पाच हजार रुपयांची मागणी करत आहेत, असा अतुल तपकीर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. तो अर्ज चौकशीसाठी तहसील कार्यालयाकडे आला. त्यानुसार 7 आक्टोबर रोजी चौकशी करण्यात येत होती.
तक्रार अर्जाची चौकशी असताना सुनील यांना विचारले असता त्यांना त्यांचा बिनशेती परवाना दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे सुनील यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावरून चिडून आरोपी तापकीर यांनी फिर्यादी लिपिक सुनील यांना तहसीलदारांसमोर कानाखाली मारली. सुनील यांना तहसीलदारांच्या केबिनवर ढकलून देत शिवीगाळ केली.