बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह हा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. परंतु सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याने अचानक ट्विटरचा वापर बंद केला होता. त्याने कोणत्याही मुद्द्यावर कोणतेही मत व्यक्त केले नव्हते. परंतु आता चार महिन्यांनंतर रणवीर सिंहने पहिल्यांदा एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट देखील एक संदेश देण्यासाठी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसच्या विरोधात एक जनआंदोलन सुरू केले आहे. पुढील काळ हा सणासुदीचा असल्याने पीएम मोदी यांनी सर्वांना विशेष खबरदारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात बॉलीवूड सेलेब्स देखील सक्रिय भूमिका घेत आहे. यात रणवीर सिंहने देखील या जन आंदोलनाचे समर्थन केले आहे.
रणवीरने मोदींची एक पोस्ट शेअर करत लिहिले की, करोनाविरोधात लढण्यासाठी एकत्र व्हा. तसेच #Unite2FightCorona हा हॅशटॅग वापरला आहे. सध्या हा हॅशटॅग खूप ट्रेंड होत आहे. दरम्यान, रणवीर सिंह हा सोशल मीडियापासून काही काळ लांबच राहिला आहे.
त्याची पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोनची एनसीबी चौकशी सुरू असतानाही त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्या काळात त्याला खूप ट्रोल देखील करण्यात आले होते. परंतु रणवीरला कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणे योग्य वाटले नाही.