पुणे –महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 तारखेऐवजी दि. 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेचे हॉलतिकीट मंगळवारपासून शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) ही 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याच दिवशी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीची परीक्षा 9 तारखेला होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.
यापूर्वी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 25 मे रोजी घेण्यात येणार होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा पुढच्या महिन्यात होत असून, हॉलतिकीटही शाळामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.