बारामती (प्रतिनिधी): व्हिडिओ शूटिंगचा वाद विकोपाला जाऊन पोलीस आणि वकिल यांच्यात हाणामारी झाल्याची घटना बारामती न्यायालयाच्या आवारात घडली. कायद्याचे रखवालदार व कायदेपंडित यांच्यात घडलेल्या या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा राहिली. अखेर वरिष्ठ अधिकारी व नेतेमंडळींच्या मध्यस्थीने पोलीस आणि वकील यांच्यातील वादावर पडदा पडला.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपचे नेते प्रशांत सातव यांच्यासह अन्य कही कार्यकर्त्यांवर दि (14 )रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कामकाजासाठी आज दि (15 )रोजी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात व्हिडिओ शूटिंग करत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास वकिलांनी मज्जाव केला. बेकायदा शूटिंग करू नये असे पोलिस कर्मचार्याला सांगण्यात आले. या कारणावरून पोलीस आणि वकील यांच्यात जुंपली.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे न्यायालयात हजर झाले.यावेळी अॅड राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर वकिलांनी सदर बाब पोलीस अधिकारी शिरगावकर यांच्या निदर्शनास आणली . मात्र चर्चेची पातळी घसरल्याने दोघांच्यात शाब्दिक चकमक तसेच शिवीगाळही झाली. वाद विकोपाला गेला त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
त्यानंतर पोलीस बळ दाखवत पोलिसांनी काही वकिलांना ताब्यात घेतले. पोलीस अधिकारी कायद्याचा गैरवापर करत असल्याचे आरोप यावेळी वकिलांनी केला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह इतर पोलिसांवरही कारवाईची जोरदार मागणी वकिलांनी केली. अखेर वरिष्ठ नेतेमंडळींच्या मध्यस्थीने वकील आणि पोलिसांच्यात समेट घडली. त्यानंतर कलम 67 प्रमाणे पोलिसांनी वकिलांना नोटीस बजावली .