पुणे(प्रतिनिधी) – छोटा राजनच्या पुतनीने राजगुरूनगरचे माजी उपसभापती आणि बांधकाम व्यावसायिकाला 50 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणात दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोमलसिंह रजपूत यांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
धीरज बाळासाहेब साबळे (वय 26, रा.धानोरे, विकासवाडी, ता.खेड) आणि मंदार सुरेश वाईकर (वय 41, रा. कोंढवा-बिबवेवाडी रोड) अशी त्या दोघांची नावे आहेत. साबळे याने ऍड. भालचंद्र पवार, योगेश पवार, तर, वाईकर याने ऍड. एन. डी. पाटील, ऍड. रेश्मा सोनार यांनी जामिनासाठी अर्ज केला. 8 ते 13 मार्च या कालावधीत ही घटना घडली. छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. पत्नीला घटस्फोट देण्याबरोबर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राजेश जावळेकर यांनी लष्कर पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यानंतर दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता.दोषारोपपत्र दाखल झाले असून, तपास पूर्ण झाला आहे. घरगुती वाद असल्याचे दिसून येत आहे. जामीन देण्याची मागणी भालचंद्र पवार यांनी केली.