सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांची उपहासात्मक मागणी
पाथर्डी – येथील दुय्यक निबंध कार्यालयामध्ये सावळागोंधळ सुरू असून अनेक बनावट पद्धतीने खरेदी झाल्या आहेत. पाथर्डी शहरातील महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमिनीची व खाजगी जमिनीची खरेदी- विक्री करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
आमची वडिलोपार्जीत शेवगाव रोडला जमीन आहे. त्या समोरील पूर्वेस महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जागेची महसुल विभागाच्या तत्कालीन व सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने पाथर्डीतील भू माफिया यांनी मोठे आर्थिक गैरव्यवहार करून चुकीची नोंद लावून त्या जागेची खरेदी विक्री केली आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत २०२१ ला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन केले होते.
त्यावेळी तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी आश्वस्त केले होते की महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमिनीवरील खोट्या नोंदी रद्द करू. पण गेली दोन वर्षापासून मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आजतागायत त्या नोंदी रद्द झाल्या नाहीत. याउलट शहर व तालुक्यांमध्ये अनेक बनावट कागदपत्र तयार करून खरेदी – विक्री होऊन त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत.
त्यामुळे माझी अशी धारणा झालेली आहे की, प्रशासनाच्या सहकार्याने बनावट कागदपत्रे तयार करून पाथर्डी शहरातील महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमिनीची व खाजगी जमिनीची खरेदी विक्री होते. त्यामुळे मला प्रशासनाने संपादित केलेल्या जागा खरेदी- विक्री करण्यासाठी परवानगी देऊन मला न्याय मिळावा, अशी मागणी गर्जे यांनी केली आहे.