सातारा – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर आता सातारा पालिकेच्या या प्रस्तावावर महाविकास आघाडी सरकारकडून गांभीर्याने विचार सुरू आहे. शहर विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी विषयाला मूर्त स्वरूप देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या दरे बुद्रुक या मूळ गावाचा दौरा केला. त्यावेळी सातारच्या नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे, अतिक्रमणविरोधी पथकाचे निरीक्षक प्रशांत निकम, अरविंद दामले यांनी त्यांची भेट घेतली होती.
सातारा शहराचा विस्तार वाढत असताना पालिकेची हद्दवाढ होत नसल्याने त्रिशंकू व हद्दीलगतच्या भागाला मूलभूत सुविधा पुरवता येत नाहीत. त्यामुळे हद्दवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी माधवी कदम व किशोर शिंदे यांनी केली. हद्दवाढीसंदर्भात जिल्हा पातळीवरील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे शंकर गोरे यांनी सांगितले. चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीची प्रक्रिया व टप्पे यांचा पालिका प्रशासनाकडून धावता आढावा घेतला. पुढील आठवड्यात या प्रस्तावाबाबत मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
एकनाथ शिंदेंकडून अपेक्षा
साताऱ्याची हद्दवाढ, बोंडारवाडी धरण या मागण्यांसाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिवेंद्रराजेंनी मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर उदयनराजे यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या शिष्टमंडळाने दरे बुद्रुक येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे हे जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांना येथील प्रश्नांची जाण आहे. शिंदे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हद्दवाढीचा निर्णय त्वरित व्हावा, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.