मायणी – खटाव-माण तालुका अँग्रो प्रो.लि. पडळ या साखर कारखान्याच्या दोन लाख एक्कावन्न हजाराव्या साखर पोत्याचे पूजन करण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार बुधवार, 15 जानेवारी रोजी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आ. प्रभाकर घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बॅंकेचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, रायगड जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, कराड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, रत्नागिरी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्वक्षेत्रातील मान्यवर व अर्थसहाय्य केलेल्या बॅंकांचे चेअरमन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान, कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत कारखान्याचे को.चेअरमन मनोजदादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक नंदकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
चालू वर्षीच्या हंगाम शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडीमुळे शरद पवार उभे राहू शकले नाहीत. परंतु, प्रभाकर घार्गे यांना कारखान्यात उपस्थित राहण्याचा शब्द दिल्याप्रमाणे बुधवार, 15 रोजी शरद पवार हे पडळ येथील माळावर उभा आधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेल्या खटाव माण तालुका अँग्रो या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2019-20 च्या दोन लाख एक्कावन्न हजाराव्या साखर पोत्याचे पूजन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील मान्यवर मंडळीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळी उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले आहे.