पिंपरी -पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भाजपाच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहर भाजपाला आणखी एक खिंडार पडले आहे.
“ना खाउंगा, ना खाने दूंगा’ असे म्हणत सत्ता काबीज केलेल्या भाजपने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या कामांची लक्तरे लाच प्रकरणामुळे अक्षरशः वेशीला टांगली गेली. सर्वांना समान न्याय या धोरणानुसार महापालिकेत सर्वांना पदे देण्याची घोषणा करत भाजपने 2017 साली अनेकांना आपल्या पक्षात घेतले. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या इनकमिंगमुळे शहरात भाजपची एकहाती सत्ता आली.
मात्र, साडेचार वर्षांत दिलेला शब्द पाळण्याची किमया शहराच्या दोन्ही आमदारांना जमली नाही. त्याचा परिपाक म्हणून शहर भाजपात नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यातच लाच प्रकरणाने नाराजांना पक्षांतर करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे अनेकांनी पक्ष बदलाची जोरदार तयारी केली आहे. तर काहीजणांनी पक्षप्रवेशास सुरुवातही केल्याचे आजच्या पक्षप्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे शहरातील कारभाऱ्यांचे पक्षावरील नियंत्रण संपुष्टात येऊ लागल्याची चिन्हे आहेत.
भाजपाच्याच नगरसेवकांनी स्थानिक नेत्यांना आव्हान देण्याचा श्रीगणेशा भोसरी मतदारसंघातून झाला. आमदारांकडून मानाचे पद देताना अन्याय झाल्याने भोसरीतील रवी लांडगे यांनी बंडाचे निशान फडकावले. त्यानंतर क्रीडा समितीचे माजी सभापती संजय नेवाळे यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरल्याचे समोर आले आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांचे पती तथा माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आज माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे आणि संजय नेवाळे यांचा प्रवेश देखील निश्चित समजला जात आहे.
काहीजण “वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक नाराज नगरसेवकांनी इतर पक्षांमध्ये चाचपणी सुरू केली आहे. काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. तर काहीजण शिवसेनेचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप प्रभाग किती सदस्यांचा होणार, प्रभागाची रचना कशी असणार हे निश्चित झालेले नाही. प्रभाग संख्या आणि रचनेच्या निश्चितीनंतर काहीजणांचा निर्णय होणार असून सध्या तरी ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.