सोमेश्वरनगर वार्ताहर: वडगाव निंबाळकर येथील एटीएम सेंटरला कॅश घेऊन जाणाऱ्या गाडीतील ४३ लाख लुटल्याचा प्रकार निरा-बारामती मार्गावर होळ आठ फाटा येथे शनिवार (ता. ३०) दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडला आहे. कॅश लुटणारे ५ आरोपी तीन तासात गजाआड करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे.
निरा-बारामती मार्गावरील एटीएम सेंटरला कॅश भरणारी गाडी होळ गावच्या हद्दीत आठफाटा येथे आली असता. दोन दुचाकीस्वारांनी चारचाकी गाडी अडवून शस्त्राचा धाक दाखवत गाडीतील 43 लाख रुपये पळवून नेले.
या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार आली असता सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी तातडीने नाकाबंदी करत तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर पणदरे ढाकाळे मार्गावर एक, मोरगाव येथे दोन आणि भोंडवेवाडीत २ दोन आरोपीना पोलिसांनी पकडले आहेत.
आरोपीना पकडण्यात नागरिक आणि होमगार्ड संतोष भोंडवे, सचिन साळुंखे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. या सर्व आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींची नावे समजू शकली नाहीत. चोरांना पकडून देण्यास सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे परिसरात कौतुक होत आहे