भोपाळ : केंद्र सरकार राज्याला देय असणारा निधी देत नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या प्रज्ञासिंह यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवर भोपाळ मतदार संघातून विजय मिळवला होता. त्यांनी लोकसभेत अलिकडेच नथुराम गोडसे यांचा उल्लेख देशभक्त असा केल्याने गदारोळ उडाला होता.
या निदर्शनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलाश मिश्रा यांनी केले. केंद्र सरकारकडून राज्याला विविध योजनांतील 32 हजार 700कोटी रूपयांचा निधी येणे आहे. केंद्र सरकारने केवळ नऊ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्राने पीक विमा योजनेतील त्यांचा वाटा दिला नसल्याच आरोप त्यांनी केला.
हा मुद्दा लोकसभेत उठवावा, यासाठी आम्ही भोपाळच्या खासदारांच्या घरापुढे निदर्शने केली, असे ते म्हणाले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अशीच निदर्शने राज्यातील अन्य खासदारांच्या निवास स्थानापुढेही केली.