बीजिंग – चीनमध्ये हेरगिरी विरोधी कामासाठी नागरिकांना सहभागी करून घेतले जावे, असे राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाने सुचवले आहे. हेरगिरीबाबतची माहिती देणाऱ्या नागरिकांना बक्षीस आणि संरक्षण देण्यात यावे, जेणेकरून हेरगिरीच्या कामात लोकांना सहभागी होण्याची यंत्रणा निर्माण करता येईल, असे देखील सुचवण्यात आले आहे.
चीनच्या अत्यंत गुप्त नागरी गुप्तहेर संस्थेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सार्वजनिक खाते सुरू केले आणि लोकांना हेरगिरीच्या विरोधात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जे लोक त्यांना माहिती देतील त्यांना पुरस्कार आणि संरक्षण देण्यात येणार आहे.
राज्य सुरक्षा मंत्रालय त्याच्या कामाबद्दल खूप गुप्त आहे आणि त्याची सार्वजनिक वेबसाइट देखील त्याच्या कामाबद्दल सविस्तर माहिती देत नसते. या मंत्रालयाने सोमवारी एक अब्जाहून अधिक वापरकर्ते असलेल्या “वुईचॅट’वर एक अकाऊंट सुरू केले. दुसऱ्याच दिवशी हेरगिरीविरोधी कामासाठी समाजातील सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याची पोस्ट टाकण्यात आली.
राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी हॉटलाइन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म सारखे रिपोर्टिंग चॅनेल चालू ठेवावे. चीनमधील संशयित हेरगिरीची माहिती वेळेवर हाताळण्यासाठी हे प्लॅटफॉर्म खुले आहेत. हेरगिरी विरोधी उपाययोजना पार पाडणे हे राष्ट्रीय संस्था, नागरी गट आणि व्यावसायिकांचे ध्येय आहे. याची जबाबदारी सरकारने आणि उद्योगपतींनी घ्यावी, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
विदेशी हेरांपासून सुरक्षित राहण्यासाठी चीनमध्ये खूपच सावधगिरी बाळगली जाते आहे. कारण अशा विदेशी हेरांमुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात येऊ शकते, तसेच देशातही अंतर्गत बंडाळी निर्माण होऊ शकते, असा धोका सरकारला सातत्याने वाटत राहिला आहे.
त्याचसाठी वर्षभरापूर्वी चीनमध्ये “वुईचॅट’ची नवीन आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. न्यूज आउटलेट्स, ब्रॉडकास्टर्स, टेलिव्हिजन स्टेशन्स, संस्कृती क्षेत्र आणि इंटरनेट सेवा प्रदाते यांनी देखील हेरगिरी विरोधी योगदान दिले पाहिजे असे त्यात नमूद केले आहे.