सोलापूर – शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन परिश्रमपूर्वक काम करीत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी सोलापूर शहरवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी(दि.26) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू प्रसारास रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
ते म्हणाले, शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहेत. मात्र या यंत्रणेस नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बिलकुल घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे.