फुलगाव गावातील स्थिती ः पश्चिमेकडून येणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे
कोरेगाव भीमा -फुलगाव (ता. हवेली) गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारातून सांडपाणी वाहत आहे. या मार्गावर दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे गटार बंदिस्त करण्याची मागणी होत आहे. तसेच गावात पश्चिमेकडून येणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामुळे फुलगावचे नागरिक त्रस्त झाले आहेत.
फुलगाव सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी गावाला लाभली आहे. आखिव रेखीव रस्ते, विस्तृत चौक, मध्यवर्ती शाळा तसेच नदीच्या तिरावर पेशवे कालीन घडीव दगडामध्ये सुंदर कमानी घाट आहे. तसेच स्वामी सरुपानंद सरस्वती याचा मठ आहे. प्रसिद्धी शनी देवस्थान आहे. लहान मोठ्या अनेक सामाजिक संस्था गावात आहेत. त्यामुळे गावात नेहमी वर्दळ असते.
गावात प्रवेश करतानाच एक कमान लागते. त्या शेजारून मोठे गटार उघडे वाहत असून दुर्गंधी येते. त्याच त्रास नागरिकांना होत आहे. त्यातच गावातल्या पश्चिमेकडील रस्त्यावर मोठे खड्डे, चर खोदले आहेत. या रस्त्यावरून मोटार सायकल स्वार व पायी चालणाऱ्यांना कसरत करावी लागते. तर हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय रस्त्याच्या पलीकडे आहे. येथील विद्यार्थ्यांना या नरकयातनेतून रोज जावे लागते.
गावाचा चौफेर विकास करण्याचा आणि रस्ते सुधारणा करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. रस्त्याच्या लगतचे शेतकऱ्यांना वारंवार विनंती करूनही ते गटार बंदिस्त करण्याचे काम करू देत नाही. गटार बंदिस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– मंदानानी संपत साकोरे, सरपंच फुलगाव
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न चालू आहे. संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत.
– विलास काळे, ग्रामसेवक फुलगाव