सातारा – डिसेंबरच्या मध्यरात्री साजरा होणाऱ्या नाताळची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी दि. 25 डिसेंबर रोजी साताऱ्यात पोवई नाका, सदर बझार येथे जिंगल बेलचे सूर ऐकू येणार आहेत. भगवान येशूच्या जन्मोत्सवाची तयारी झाली असून सातारा शहरातील चर्च विद्युत रोषणाईने झळाळली आहेत.
वेगवेगळ्या चवीच्या पेस्ट्रिजने फुललेल्या बेकरी आणि नाताळच्या पारंपरिक उत्सवासाठी साताऱ्यात कपडे, पेस्ट्री व चॉकलेट खरेदीची धूम उडाली आहे. पोवई नाका येथील टिळक मेमोरियल चर्च परिसर विद्युत रोषणाईने झळाळले आहे. बुधवारी नाताळनिमित्त सेंट पॉल स्कूल तसेच येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान येशूच्या जन्मोत्सवासाठी साताऱ्यातील सर्व ख्रिश्चन बांधव चर्च परिसरात जमा होणार असल्याने पोवई नाका परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
साताऱ्यात व परिसरात काही वर्षांपासून नाताळ हा निव्वळ धार्मिक सण म्हणून न राहता पर्यावरण प्रबोधन, संस्कृती संवर्धन, सर्वधर्म सुसंवाद आणि समन्वय या अंगाने साजरा होऊ लागला आहे. त्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होत आहेत. नाताळच्या तयारीनिमित्त शहरातील विविध दुकानांमध्ये सांताक्लॉजच्या वेषभूषा, विशेष खेळणी केक व चॉकलेट उपलब्ध असून त्याच्या खरेदीसाठी पोवई नाका व राजवाडा परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.