आरोग्य सेवेवर परिणाम : 11 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 33 परिचारिकांची पदे रिक्त
– प्रकाश गायकर
पिंपरी – शहराच्या शासकीय आरोग्य यंत्रणेमध्ये वरिष्ठ डॉक्टरांचा अभाव आहे. यासोबतच वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार केला तर शहराची लोकसंख्या 27 लाखांपर्यंत पोचली आहे. या आधारे 1 लाख 58 हजार लोकसंख्येमागे एक क्लास वन डॉक्टर असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
शहरामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय हे महापालिकेचे सातशे खाटांची क्षमता असलेले मोठे रुग्णालय आहे. यासोबतच इतर सात रुग्णालये व 28 दवाखाने आहेत. शहरातील वायसीएम रुग्णालयामध्ये जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. शहरातील गरीब जनतेची आजही महापालिकेच्या रुग्णालयांकडे धाव आहे. मात्र रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात वानवा नित्याचीच आहे.
विषयतज्ज्ञ, वर्ग एक दर्जाचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सापडणे अवघड आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. शहराची लोकसंख्या सुमारे 27 लाखांच्या घरात पोहचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी फक्त 17 वर्ग 1 वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. त्यामधील 5 वर्ग 1 चे वैद्यकीय अधिकारी हे वायसीएम रुग्णालयात कार्यरत आहेत. तर उर्वरित 12 अधिकारी शहरातील इतर रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. राज्यभरातील रुग्ण वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याने येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी भासते.
यासोबतच, परिचारिका व वर्ग 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. महापालिकेच्या वतीने 272 परिचारिकांची पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात 239 पदे भरलेली आहेत. तर 33 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची 82 पदे मंजूर असून, 71 पदे भरण्यात आली आहेत. तर 11 पदे रिक्त आहेत. विविध आजारांवरील उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्ण येतात. एकट्या वायसीएम रुग्णालयामध्ये रोज सातशे रुग्ण आपोडीमधून तपासणी करून घेतात. त्यातील गंभीर रुग्णांना रुग्णालयात भरती केले जाते. सर्पदंश, विषबाधा, डेंग्यू, अपघातात जखमी झालेले रुग्ण याठिकाणी आणले जातात. त्यांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये भरती करून घेणे आवश्यक असते. मात्र अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. योग्य व वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये वादाचे प्रसंग होतात.
महापालिकेची मदार कंत्राटी पद्धतीवर
शासनाकडून भरण्यात येणारी पदे रिक्त असताना महापालिका कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यावर भर देते. यासाठी दर सहा महिन्याला परीक्षा घेऊन कंत्राटी पद्धतीने काही पदे भरली जातात. मात्र, यामध्ये क्लास वन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश नाही.
पाठपुरावा करण्याची प्रशासनाची जबाबदारी
पुरेशा मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवा कोलमडली असताना सरकारकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पदे भरण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. रिक्त पदांबाबत सरकारला अहवाल पाठविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. दर तीन महिन्यांऐवजी दर महिन्याला शासनाला याबाबत पत्र देऊन पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
रिक्त पदे भरण्यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. जी पदे रिक्त आहेत ती भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
– मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी.