नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात ‘एनडीए’मध्ये लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान हे सामील झाले आहेत. याबाबतची घोषणा भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल केली. विशेष म्हणजे आज सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीच्या एक दिवस आधीच चिराग पासवान हे ‘एनडीए’मध्ये सामील झाले. त्यामुळे विरोधकांसाठी हा एक धक्का मानला जात आहे.
दरम्यान,चिराग पासवान ‘एनडीए’मध्ये सामील झाल्यानंतर जेपी नड्डा यांनी ट्वीट करत त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी, रविवारी चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील यांच्या पक्षाचा वाटा निश्चित करण्यासंबंधित चर्चा झाली.
श्री @iChiragPaswan जी से दिल्ली में भेंट हुई। उन्होंने माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व वाले NDA गठबंधन में शामिल होने का निर्णय लिया है। मैं उनका NDA परिवार में स्वागत करता हूँ। pic.twitter.com/vwU67B6w6H
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) July 17, 2023
२०१९ मध्ये चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील अविभाजीत लोक जनशक्ती पक्षाने लोकसभेच्या सहा जागा लढवल्या होत्या. तसेच राज्यसभेची एक जागाही मिळवली होती. त्याप्रमाणे त्यांच्या पक्षाला वाटा मिळावा, अशी मागणी पासवान यांची आहे. त्यानंतर त्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे तत्कालीन मित्रपक्ष जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांच्या विरोधामुळे चिराग पासवान एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर २०२२ मध्ये नितीश कुमार स्वत: ‘एनडीए’तून बाहेर पडले. त्यामुळे आता चिराग पासवान पुन्हा भाजपाबरोबर एनडीएमध्ये सामील झाले आहेत.