नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरून भारताच्या हद्दीत शिरलेल्या एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने पकडले आहे. वॉंग या लॉंग असे या सैनिकाचे नाव आहे. त्याला तेथे तातडीने ऑक्सिजन, अन्न, गरम कपडे आणि वैद्यकीय उपचारांची गरज होती. भारतीय लष्कराने त्याला ती मदत देऊ केली. आता त्याची चीनमध्ये परत पाठवणी केली जात आहे, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून दोन्ही बाजूंकडून तेथे प्रत्येकी 50 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. तशातच तेथील देमचोक सेक्टरमध्ये एक चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्याला आवश्यक ती सर्व मदत आणि उपचार देण्यात आले.
चीननेही त्या विषयी भारतीय लष्कराकडे विचारणा केली होती. त्यांना त्याच्या विषयीची माहिती तातडीने पुरवण्यात आली, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. त्याच्या संबंधातील सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या सैनिकाला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाईल, असेही भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.