चिंचवड – रस्ता वाहने धावावीत म्हणून केला जातो, परंतु चिंचवडगावात मात्र रस्ता जणू काही भंगार वाहनांच्या पार्किंगसाठी केला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. थेरगाव घाट ते जिजाऊ पर्यटन केंद्र येथील रस्त्यावर थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 14 भंगारातील वाहने उभी केली आहे. महापालिकाही या वाहनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने भंगार वाहनांसाठी हा रस्ता तयार केला आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहराच्या विविध भागातील भंगार वाहने ही महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम महापालिका आणि पोलिसांच्यावतीने जानेवारी महिन्यात घेण्यात येईल, असे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी जाहीर केले होते. मात्र फेब्रुवारी महिना निम्मा संपत आला तरी अशा वाहनांवर कारवाई केलेली नाही. यामुळे आगामी काळातही अशी कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न आहे.
भंगार वाहनांमुळे रहदारीस तर अडथळा ठरतोच. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांना या भागातील साफसफाईही करता येत नाही. भंगारातील या वाहनांचे काही भाग चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
यापैकी बहुतांश वाहने सुरू होण्याची शक्यता नाही. थेरगाव घाटाजवळ एक मोठे गॅरेज आहे. या गॅरेजच्या बाहेर तब्बल 14 भंगारातील वाहने गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.