बीजिंग: ह्युस्टन येथील चीनच्या वाणिज्य दूतावासामध्ये अमेरिकेच्या विधी अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या घुसखोरीवर चीनने जोरदार आगपाखड केली आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या वाणिज्य दूतावासामध्ये बळजबरीने प्रवेश केला होता. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते वॅंग वेन्बीन यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ह्युस्टन येथील चीनचा वाणिज्य दूतावास डिप्लोमॅटिक असून या दूतावासाचा परिसर म्हणजे चीनची राष्ट्रीय मालमत्तेसमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दूतावासासंबंधी व्हिएन्ना ठरावानुसार आणि चीन-अमेरिकेतील दूतावासविषयक करारानुसार अमेरिकेने चीनच्या ह्युस्ट्तन येथील दूतावासाच्या परिसरमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करता कामा नये, असे ते म्हणाले.
अमेरिकेने चिनी दूतावासामध्ये बळजबरीने केलेल्या घुसखोरीबद्दल चीनला तीव्र आक्षेप आहे. त्याबद्दल अमेरिकेच्या प्रतिनिधींकडे चीनने आपला निषेध नोंदवला आहे. या संदर्भात आवश्यकतेनुसार आणि योग्य पद्धतीने चीनकडून प्रतिसाद दिला जाईल, असे वॅंग म्हणाले.