अनलॉक सासवडमध्ये डिस्टन्सिंगचा “फज्जा’

बाजारपेठेत नियम पायदळी : करोना फैलावणार?
केतकावळे (वार्ताहर) –
सासवड (ता. पुरंदर) शहर सोमवार (दि. 27) पासून अनलॉक झाले. मात्र, पहिल्याच दिवशी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना सर्वांकडूनच केराची टोपली दाखवण्यात आली.

सासवड शहरात सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत आठवड्यातील 5 दिवस सर्व व्यवहार शासनाच्या नियमांचे पालन करून सुरू करण्यात आले आहे. शनिवार, रविवारी पूर्ण बंद ठेवण्याविषयी प्रांताधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर व्यापारी व प्रशासन यांच्यातील चर्चेनंतर ठरवण्यात आलेला आराखडा सादर करणार असल्याचे सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी पत्रकार परिषदेत रविवारी (दि. 26) सांगितले होते. यावेळी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, गिरीश कर्नावट, रुपचंद कांडगे, रमेश जगताप, गणेश चौधरी, राजेंद्र महाजन उपस्थित होते.

सकाळपासून नागरिकांनी नियमांना पूर्णत: पायदळी तुडवल्याचे दिसून आले आहे. शहरात सकाळपासून दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी नियमांना हरताळ फासत गर्दी केली होती. त्यामुळे शासनाचा अनलॉक हेतूच “लॉक’ झाला आहे. त्यामुळे प्रशासनावर आणखी ताण येण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

शहरातील बाजारपेठ, एसटी स्टॅंड परिसर, सोपानगर, भाजीमंडई, तारादत्त पार्क, जेजुरी नाका आदी भागात गर्दी दिसून आली. मात्र, दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सोशल डिस्टन्स नसल्यामुळे शहरात आणखी करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. पुरंदर तालुका करोनाच्या विळख्यात सापडला असताना अनलॉकचे नियम नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.