बीजिंग: करोना विषाणू कसा उत्पन्न झाला, हे शोधण्यसाठी जागतिक समुदायाला सहकार्य करण्यास चीनने तयारी दर्शवली आहे. मात्र या शोधाच्या प्रक्रियेतून राजकारण केले जायला नको. आंतरराष्ट्रीय विज्ञान विषयक समुदायाला करोनाबाबतच्या संशोधनास सहकार्य करण्यास चीन तयार आहे. मात्र ही शोधाची प्रक्रिया पूर्णपणे व्यवसायिक, भेदभावरहित आणि विधायकच असली पाहिजे, असे असे चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग वी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात जगभरातील वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना या संशोधनामध्ये सहभागी होऊ द्यावे, असेही वॅंग वी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.
करोना विषाणूची उत्पत्ती कोठे झाली, या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेतील वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या विषाणूची उत्पत्ती चीनमध्येच झाली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी केला आहे. तर हा आरोप पूर्वग्रहदूषित आणि सपशेल खोटा असल्याचे चीनने म्हटले आहे. यातून केवळ भूराजकीय राजकारणच केले जात आहे. त्यामुळे वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञांनीच या विषयी संशोधन करून सत्य मांडावे, असे वॅंग यांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने प्रथमपासूनच करोना विषाणूबाबतच्या वैज्ञानिक शिफारसी केल्या आहेत. “डब्लूएचओ’चे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयसिस यांनी अत्यंत योग्यवेळी व्यवसायिक शिफारसी केल्या होत्या. केवळ एकमेकांवर दोषारोप करून कोणत्याही देशातील समस्या सुटणार नाही. मात्र त्यामुळे एखाद्या देशाला दुखावले जाईल आणि त्या देशाच न्याय हक्क नाकारला जाईल, असेही वॅंग वी म्हणाले.