वॉशिंग्टन – भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या स्थितीवर आमचे लक्ष असून शेजारील देशांना धमकावण्याचा किंवा त्यांच्यावर दहशतीने दबाव आणण्याचा जो प्रयत्न चीनने चालवला आहे तो चिंताजनक आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.
व्हाइट हाऊसच्या एका विभागाचे प्रवक्ते एमिली जे हॉर्न यांनी या संबंधात नमूद केले आहे की, भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपसातच चर्चा करून संबंधीत वादावर तोडगा काढला पाहिजे. या चर्चेच्या प्रस्तावाला आम्ही सहकार्य करू असे त्या म्हणाल्या. तथापि चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा जो आरोप होतो आहे त्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. भारत आणि प्रशांत महासागर भागातील अशा प्रकारच्या तणावाच्या स्थितीत आम्ही आमच्या मित्रांबरोबर उभे राहू असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. बायडेन प्रशासनाने भारत-चीन संबंधांवर प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.