नवी दिल्ली – दिल्लीत गेल्या महिन्यात जो सीरो सर्व्हे करण्यात आला होता, त्याचा अहवाल आला असून त्यानुसार राजधानीतील 56.13 टक्के लोकांच्या शरिरात अँटीबॉडी तयार झाल्याचे आढळून आले आहे. करोना झाल्यावर अँटीबॉडी तयार होत असतात. त्या आधाराने विचार केला तर दिल्लीतील निम्मे नागरिकांना त्याची लागण होउन गेली असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होते आहे.
बाधितांचे अथवा लागण झाल्याचे हे प्रमाण पाहता दिल्लीत आता हर्ड इम्युनिटी अर्थात समूह प्रतिकार शक्ती विकसित झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आणि सगळे व्यवहार सुरळीत सुरू झाल्यानंतरही दिल्लीत आता करोनाचा प्रभाव नगण्य आहे. अर्थात हर्ड इम्युनिटी तयार झाली असली तरी सगळ्यांनी लस घेणे आवश्यकच असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले आहे. त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे बचाव केला जाउ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील पाचव्या सीरो सर्वेसाठी 11 ते 22 जानेवारी या काळात दिल्लीतील सगळ्या वॉर्डमधील 28 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते. हा आतापर्यंतचा सगळ्यांत मोठा सर्वे होता. त्याचा अहवाल अधिकृतपणे अद्याप जाहीर केला गेला नसला तरी 56.13 टक्के लोक सीरो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.