बीजिंग – तैवानच्या समुद्रधुनीमध्ये अमेरिकेच्या नौदलाच्या दोन युद्धनौका तैनात करण्यावरून चीनने जोरदार आगपाखड केली आहे. या युद्धनौका तैनात करण्यामागे अमेरिकेचा शक्तीप्रदर्शनाचा हेतू असल्याची टीका चीनने केली आहे.
अमेरिकेची ही कृती चिथावणीखोर आणि प्रक्षोभक आहे. यामुळे तैवानमधील स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गटांना चुकीचा संदेश दिला गेला आहे. तसेच तैवान समुद्रधुनी भागातील शांतता आणि स्थिरतेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
या युद्धनौकांच्या हालचालींवर अवकाशातून आणि सागरातूनही लक्ष ठेवले जात आहे, असेही चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या नौदलातील युएसएस जॉन एस मॅक्गेन आणि युएसएस क्युर्टिस विल्बर या अरिग बुर्क श्रेणीतील क्षेपणास्त्र नाशक युद्धनौका तैवानच्या समुद्रधुनीमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. या युद्धनौका नियमित कार्याचा भाग म्हणून आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरूनच तैनात करण्यात आल्या आहेत, असे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे.
या युद्धनौका तैवानच्या समुद्रधुनीमध्ये तैनात करण्यामागे अमेरिकेची मुक्त आणि खुल्या भारत-प्रशांत क्षेत्रामागील कल्पनेची कटिबद्धता आहे, असेही अमेरिकेच्या नौदलाने आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चीनने तैवानला नेहमी आपला भूभाग म्हटले आहे. मात्र तैवानची समुद्रधुनी आंतरराष्ट्रीय सागरीमार्ग म्हणूनच ओळखली जाते.