बिजींग – चीनने पाकिस्तानला अत्याधुनिक आणि सर्वात मोठे लढाऊ जहाज दिले आहे. अरबी समुद्र आणि भारतीय उपसागरात पाकिस्तानी नौदलाचा प्रभाव वाढावा आणि त्यांच्या योगे या सागरी हद्दीत आपला प्रभाव प्रस्थापित व्हावा या उद्देशानेच चीनने पाकिस्तानला ही मोलाची मदत केली असल्याचे मानले जात आहे.
हे जहाज चीनच्या शिप बिल्डिंग कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने बांधले असून त्याच्या जलावतरणाचा कार्यक्रम नुकताच शांघाय येथे पार पडला. पाकिस्तानी नौदलाने या जहाजाला पीएनएस तुघ्रील असे नाव दिले आहे.
या युद्धनौकेमुळे भारतीय सागरी भागात आता सागरी सत्तेचा समतोल साधला जाईल असे पाकिस्तानचे चीनमधील राजदूत मोईन उल हक यांनी म्हटले आहे. या युद्धनौकेमुळे पाकिस्तानी नौदल आता तेथील कोणत्याहीं सागरी आव्हानाचा मुकाबला करण्यास सिद्ध होईल असेही त्यांनी नमूद केले.
ही युद्धनौका सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. या नौकावरून जमीनीवर अथवा हवेत क्षेपणास्त्र मारा करता येऊ शकतो तसेच पाण्याखालूनही मारा करणारी क्षेपणास्त्रे येथून डागली जाऊ शकतात. तसेच या नौकेवर सागरी टेहेळणीचीही चौफेर यंत्रणा कार्यरत आहे.
चीनने अन्य देशांना निर्यात केलेली ही पहिलीच मोठी युद्धनौका आहे. चीनची पाकिस्तानी नौदलाबरोबरच त्यांच्या हवाईदलाशीही मोठी भागीदारी आहे. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश मिळून जेएफ-17 जातीची थंडर फायटर विमाने बनवत आहेत.