दुबई : टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खुद्द आयसीसीनेच नियमात बदल केल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा घेतल्यावर आयसीसी त्यांच्या संघाला निलंबित करणार होती. मात्र, तालिबानने केलेल्या विनंतीनंतर आयसीसीने त्यांच्या संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली.
या स्पर्धेत सहभागी होताना देशाचा राष्ट्रीय ध्वज असणे तसेच राष्ट्रगीताबाबतचे आयसीसीचे काही नियम आहेत. मात्र, तालिबानने संघाला राष्ट्रगीत गाण्याची सूचना करतानाच संगीताचा वापर करू नये, असे स्पष्ट सांगितले होते.
तसेच अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज न वापरता क्रिकेट संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी होण्याचीही सूचना केली होती. स्पर्धा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली होती, त्यामुळे आयसीसीने नियमांत बदल करत त्यांच्या संघाला परवानगी दिली.
अर्थात या पुढील काळात अफगाणिस्तानला आयसीसीच्या मूळ नियमानुसारच खेळावे लागणार असून आता इथून पुढील काळात कोणत्याही संघासाठी नियमांत बदल होणार नाहीत, असेही आयसीसीने सांगितले आहे.