नवी दिल्ली – पाकिस्तानमधील ग्वादर बंदरावर बलुच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा चीनने निषेध केला आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत या बंदराचा ताबा चीनकडे आहे. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांना चीनचा पाठिंबा असल्याचे चीनने म्हटले आहे.
काल ग्वादर बंदरावर बलुच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तान लष्कराचे दोन सैनिक देखील मारले गेले होते. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीमध्ये बलुच लिबरेशन आर्मीशी संबंधित संघटनेचे ८ दहशतवादी ठार झाले होते.
ग्वादर पोर्ट ऍतोरिटी कॉम्प्लेक्सच्या आवारामध्ये घुसण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी निष्फळ केला होता. या हल्ल्याचा चीन निषेध करत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जुआन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील विविध विकास कामांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे. या विकास प्रकल्पांना स्थानिक बलुच जनतेचा मोठा विरोध आहे. प्रकल्पांवर चिनी कामगार असल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही. तसेच खाण उद्योगात चिनी कंपन्या बलुचिस्तानमधील खनिज संपत्तीचे बेसुमार उत्खनन करत असल्याचा आरोप देखील बलुचवासियांकडून केला जातो आहे.