सांगली -तासगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका चिमुकलीला आपणे प्राण गमवावे लागले. गंभीर जखमी अवस्थेत तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तासगाव तालुक्यात मतकुणकी- वासुंबे रस्त्यावर शिरतोडे वस्ती आहे. या ठिकाणी संजय शिरतोडे यांचे पत्र्याचे घर आहे. घरात त्यांची एक नंदिनी नावाची चार महिन्यांची मुलगी पाळण्यात होती. सोमवारी सायंकाळी तासगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.
यावेळी शिरतोडे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे नंदिनीचा पाळणादेखील चिमुरडीसह उडून गेला. पाळणा शंभर फूट दूर जाऊन पडल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने मिरजेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.