शालेय जीवनात असताना आपण सर्वच जण वेगवेगळ्या गोष्टी वाचत-ऐकत असतो. यातील काही गोष्टी आयुष्यभर विसरता येत नाहीत. जगभरात भारतीय सौंदर्याची पताका फिरवणाऱ्या माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लरनेही अशीच एक कहाणी तिच्या लहानपणी ऐकली होती. ही गोष्ट होती पृथ्वीराज आणि संयोगिता यांच्यातील प्रेमाची. योगायोगाने मानुषीला “पृथ्वीराज’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात संयोगिताची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे.
याविषयी मानुषी सांगते की, आदित्य चोपडांकडून “पृथ्वीराज’साठीचा प्रस्ताव जेव्हा मला मिळाला तो माझ्या आयुष्यातील एक अत्यंत सुंदर योगायोग होता. मी जसजशी तरुण होत गेले तसतशी मला ऐतिहासिक कथा, भव्यदिव्य सम्राटांच्या कहाण्या, इतिहासात अजरामर झालेल्या नायकांचे जीवनचरित्र यांमध्ये रुची वाढत गेली.
पृथ्वीराज आणि संयोगितांची प्रेमकहाणी तर मला सुरुवातीपासून आवडत आली आहे. आता यशराज फिल्मस्सारखा बॅनर त्यावर चित्रपट बनवत असून त्यामध्ये अक्षयकुमारसारखा सुपरस्टार अभिनेता म्हणून झळकणार आहे आणि अशा चित्रपटाची नायिका मी असणार आहे हे सारं मला स्वप्नवत वाटतं. भारतीय इतिहासातील एक सुंदर अध्याय असणाऱ्या संयोगिताचं जीवन जगण्याचं भाग्य मला लाभतं आहे, याबाबत मी स्वतःला खूप नशीबवान समजते, असं ती सांगते.