पारगाव शिंगवे – घरासमोरील अंगणात खेळत असलेला दोन वर्षीय लहान मुलगा अचानक गायब झाला. सोमवारी ( दि. 8) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवेमळा येथे ही घटना घडली.
कृष्णा विलास गाढवे असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. या मुलाला बिबट्याने उसाच्या शेतात पळवून नेल्याचा ग्रामस्थांचा व घरच्यांचा संशय असून वनविभागाची रेस्क्यू टीम व अधिकारी यांनी उसाच्या शेतात मुलाची शोधमोहीम सुरु केली आहे. शेतकरी विलास कुंडलिक गाढवे यांचा हा कृष्णा घरासमोरील अंगणात खेळताना 9 वाजण्यास सुमारास अचानक गायब झाला. मुलाची आई सविता घरासमोरील अंगणात मुलाला पाहाण्यासाठी आली. मुलगा घराच्या आसपास नसल्याचे वस्तीमधील ग्रामस्थांना सांगितले.
गाढवे मळा येथे महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याने व पाळीव कुत्रे तसेच शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून उसाच्या शेतात पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या मुलाला बिबट्याने उसाच्या शेतात पळून नेल्याचा संशय नागरिकांना असून ग्रामस्थ तसेच वनविभागाने उसाच्या शेतात शोध मोहीम राबवली असून साडेपाच वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती; परंतु मुलगा सापडला नाही.
घटनास्थळी वनविभागाचे वनपाल व्ही. आर. वेलकर, वनपाल एन. एम. आरूडे, तसेच वनरक्षक पूजा पवार, सी. एस. शिवशरण, मंचर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार कैलास कड, पोलीस पाटील गणेश पंडित, उपसरपंच संतोष वाव्हळ, ग्रामपंचायत सदस्य हिरामण गोरडे, नविना गाढवे, नारायण गाढवे, विलास भोर, मिलिंद टेमकर, मनोज तळेकर, आदी व ग्रामस्थांनी मुलाचा शोभ घेण्यासाठी मदत केली.