मुंबई : जळगावातल्या पाचोरा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा रविवारी पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपाचा समाचार घेतला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता प्रत्युत्तरे देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि पाकिस्तान याविषयी जे वक्तव्य केले त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
सभेत उद्धव ठाकरे यांनी,”खरी शिवसेना कोणती हे जाणून घ्यायचं असेल तर पाकिस्तानला विचारा, पाकिस्तानही सांगेल. मात्र निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे त्यामुळे त्यांना ते दिसत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘खरी शिवसेना कुणाची हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट लागतं हे दुर्दैव आहे असा खोचक टोला लगावला आहे.
जळगावातल्या पाचोरा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा घेतली त्यावेळी त्यांनी “इथे जमलेली गर्दी पाहून खरी शिवसेना कुणाची? हे दिसतंय ना? हे कळतं आहे ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कुणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पाचोऱ्यातल्या सभेत टीका केली होती.
पुढे बोलताना कुणीतरी सांगितलं की खरी शिवसेना काय आहे ? हे पाकिस्तानला विचारलं तरीही ते सांगतील. असं भाष्य केलं गेलं आहे. हे महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव आहे. कारण तुम्हाला तुमची शिवसेना खरी की खोटी हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं? असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.