Eknath Shinde : मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम म्हणजेच डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबविण्याचे नियोजन केले आहे. आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या मोहिमेचा आढावा घेतला. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
या विशेष स्वच्छता मोहिमेत मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाण्याचा पाईप हाती घेत या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू इस्कॉन मंदिरात राधे कृष्णाचे दर्शनही घेतले.
संपूर्ण स्वच्छता अभियान
09-12-2023 📍विले-पार्ले पूर्व, मुंब https://t.co/dasDVlmSOT
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 9, 2023
यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. मुंबई स्वच्छ आणि चांगली करण्यासाठी खरा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. मुंबईला स्वच्छ करण्यासाठी अद्यावत प्रणालीची मशीन आणण्यात आली आहे. ज्यामध्ये चौपाटीवरील कचरा स्वच्छ केला जाणार आहे. मी स्वतः ती चालवून पाहिली. प्रदूषण दूर करण्यासाठी क्लीन मोहिम मुंबईकरांसाठी हाती घेतली आहे. ही चळवळ शहरभर चालू करणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून यासंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरु केली आहे.