मुंबई – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अपमानास्पद टीका केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणावरून राज्यभर संतापाची लाट उसळली असून अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय आहे प्रकरण –
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना सुप्रिया सुळे यांच्यावर यांनी टीका केली. राज्यात सत्तांतर झाले तेंव्हापासून विरोधी पक्षाकडून शिंदे यांच्या गटातील आमदारांवर खोके (पैसे) घेतल्याची टीका होत आहे. सुप्रिया सुळे यांनीही यावरून टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर उत्तर देताना सत्तार यांनी सुळे यांना भिकार** म्हंटले. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी होत आहे. राज्याभरात सत्तार यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यभरात पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी नोंद करण्यात येत आहेत. तसेच सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी ही मागणी केली आहे.
सत्तारांनी मागितली माफी –
“मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे.