पुणे – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारवर शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याची विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर खोके घेतल्यावरून टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे भिकार** म्हटल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुध्दा अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे की, “कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही. सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं? अस सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही.महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 7, 2022
पुढे रोहित पवारांनी म्हटले आहे की, सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक ‘बदला’ घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात. आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या, असा सल्ला देखील रोहित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दिला आहे.