रायपूर – भाजपचे नेते विष्णुदेव साय येत्या बुधवारी छत्तिसगढच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. आदिवासी समाजातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मान साय यांना मिळाला आहे. ते मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसमवेत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
तो सोहळा दुपारी २ वाजता छत्तिसगढची राजधानी रायपूरमध्ये होईल. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, आणखी काही केंद्रीय मंत्री आणि भाजपचे इतर राज्यांमधील मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारून छत्तिसगढची सत्ता काबीज केली. त्या पक्षाने विधानसभेच्या एकूण ९० पैकी ५४ जागा जिंकल्या. आता भाजप सरकार स्थापनेसाठी सज्ज झाला आहे.