साओ जोस दो नोर्त (ब्राझील) – ब्राझीलच्या दक्षिण समुद्रकिनारपट्टीजवळ बर्ड फ्लूमुळे तब्बल एक हजार सील आणि सी लायन या जलचरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक कुक्कुटपालन केंद्रांमधून बर्ड फ्लू संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट समुद्रात लावली गेल्यामुळे या रोगाचा फैलाव होतो आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रिओ ग्रॅन्ड दा सुल या दक्षिणेकडील एकाच प्रांतात ९४२ सागरी जीव मरण पावल्याचे आढळल्याचे स्थानिक प्रशासनाने मान्य केले आहे. हे सील आणि सी लायन प्रथमच बर्ड फ्लू ने मरण पावल्याचे ब्राझीलमध्ये आढळले आहे. या जलचरांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्याला येऊन पडले होते.
ते तेथून तातडीने हटवण्यात आले असून त्यांचे जवळच्या जमिनीमध्ये दफन करण्यात आले आहे. संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक कुक्कुटपालन केंद्रांची तपासणी केली जाऊ लागली आहे. तेथील बाधिक कोंबड्यांची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत.